अभिषेकच्या वादळाने इंग्लंडची टीम उध्वस्त, भारताने 13व्या ओव्हरमध्ये पहिला T20I जिंकला


Marathi news in marathi

IND vs ENG 1st T20I: ईडन गार्डन्स मैदानावर अभिषेक शर्माने फटकेबाजी करत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताला 7 विकेटने विजयी केलं. अभिषेकच्या या वादळी खेळीपूर्वी भारतीय गोलंदाजांनी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या टॉस जिंकून घेतलेल्या फिल्डिंगच्या निर्णयाला योग्य ठरवत इंग्लंडला फक्त 132 धावांवर गुंडाळलं. 

भारताने प्रत्युत्तरात 43 चेंडू राखून सामना जिंकत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 

अभिषेक शर्माची वादळी खेळी:

133 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ओपनिंगला उतरले. संजू सॅमसन 26 धावा करून माघारी परतला. त्यानंतर अभिषेक शर्माने (33 चेंडू – 79 धावा) इंग्लंडच्या गोलंदाजांवर धावांचा धडाका लावला. 9व्या ओव्हरमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण करत 10व्या ओव्हरमध्ये भारताच्या धावसंख्येला 100 चा आकडा गाठवला. 

अभिषेकने चौकार-षटकारांची आतषबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना धास्तावलं. 12व्या ओव्हरमध्ये आदिल रशिदच्या गोलंदाजीवर तो आऊट झाला, पण त्याआधी त्याने सामना जिंकण्याचा पाया रचला होता. 34 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 200 च्या स्ट्राइक रेटने त्याने 79 धावा फटकावल्या. 

दुसरी सर्वात जलद अर्धशतक:

अभिषेकने फक्त 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरं सर्वात जलद अर्धशतक झळकावलं. युवराज सिंगने 12 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकण्याचा विक्रम अजूनही अबाधित आहे. अभिषेकच्या खेळीपूर्वी संजू सॅमसननेही गस एटकिन्सनच्या एका ओव्हरमध्ये 4 चौकार आणि एका षटकारासह 22 धावा काढल्या. 

वरुण-अक्षरची फिरकी आणि पेसर्सचा धमाका:

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (68) च्या अर्धशतकानंतरही इंग्लंडला सुरुवातीच्या झटक्यांमधून सावरता आलं नाही, आणि त्यांचा डाव 132 धावांवर संपुष्टात आला. भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. वरुण चक्रवर्तीने 23 धावा देत 3 बळी घेतले, तर अर्शदीप सिंहने 17 धावांत 2 बळी घेत ऐतिहासिक कामगिरी केली. अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्यानेही प्रत्येकी 2 बळी घेतले. 

अर्शदीप सिंहचा ऐतिहासिक विक्रम:

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 97 बळी मिळवण्याचा विक्रम केला. त्याने युजवेंद्र चहलचा 96 बळींचा विक्रम मागे टाकला. अर्शदीपने फक्त 61 सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला, जो चहलने 80 सामन्यांत गाठला होता. 

भारताने या शानदार विजयासह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत प्रभावी सुरुवात केली आहे.

Leave a Reply